वृक्षवल्ली टीम तपोवन संरक्षणार्थ सरसावली

Foto
सिल्लोड, (प्रतिनिधी) : नाशिकमध्ये २०२७ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याची जोरदार तयारी सुरू झाली असून, तपोवन परिसरातील प्रस्तावित साधूग्राम प्रकल्पासाठी तब्बल १८०० झाडे तोडण्याचा विचार महाराष्ट्र शासन करीत आहे. साधू-महंतांच्या तात्पुरत्या निवासासाठी ११५० एकरांवर साधूग्राम उभारण्याचे नियोजन असून, त्यासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड करावी लागणार आहे. या निर्णयाचा नागरिक, पर्यावरणप्रेमी, स्थानिक संघटना तसेच अनेक सेलिब्रिटींनी जोरदार विरोध केला आहे.

वृक्षवल्ली टीम, सिल्लोड ही पर्यावरणप्रेमी संघटना गेली कित्येक वर्ष तालुक्यामध्ये कार्यरत असून नियमित वृक्षारोपण कार्यक्रम घेणे, सिंचन, जैविक खतांचा वापर करून लावलेल्या रोपांचे पोषण आणि संरक्षण करण्यासाठी प्रोत्साहन देण्याचे मोलाचे कार्य ही संघटना करीत आली आहे. वृक्षांच्या कत्तली विरोधात या संघटनेने निषेध नोंदविला असून त्याबाबतचे निवेदन वजा विनंती पत्र मा. तहसीलदार संजय पांडुरंग भोसले साहेबांकडे सुपुर्द करण्यात आले आहे.


झाले असे की, सिल्लोड शहरातील पर्यावरणप्रेमी असलेले विविध डॉक्टर्स आणि व्यावसायिक यांच्या वृक्षवल्ली टीम, सिल्लोड नामक संघटनेचे प्रतिनिधी आणि शहरातील नामवंत अस्थिविकार तज्ञ डॉ. निलेश मिरकर यांनी प्रत्यक्ष नाशिक येथील तपोवन या निसर्गरम्य परिसरास भेट दिली. 

तेथे चालू असलेल्या वृक्षतोड विरोधातील आंदोलनात हिरिरीने सहभाग घेतला. शासन एकीकडे नागरिकांना पर्यावरणाचे संवर्धन करणे, वृक्षांची लागवड करणे,
वृक्षारोपण कार्यक्रम राबवणे, स्मार्ट सिटीचे स्वप्न बघत असताना, दुसरीकडे इतक्या मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड करण्याची बाब विचाराधीन ठेवत आहे.
ही दुटप्पी भूमिका आम्हास अमान्य असून शासनाने हा विचार त्वरित मागे घ्यावा, अशी भावना यावेळी डॉ. शेखर दौड यांनी व्यक्त केली. शांत मार्गाने निवेदन देऊन वृक्षतोड थांबवली नाही, तर आंदोलनासाठी रस्त्यावर उतरण्याची तयारी श्री. अजय वाघ यांनी शब्दांमध्ये व्यक्त करून दाखवली. 

यावेळी धन्वंतरी डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. निलेश मिरकर, डॉ. शेखर दौड, डॉ. विकास गोठवाल, डॉ. अक्षय बेवाल, डॉ. संतोष शिंदे, डॉ. दीपक अपार, डॉ. संदीप गायकवाड, डॉ. शेखर रोकडे, डॉ. अविनाश भारती, डॉ. ऋषभमंडलेचा, युवराज फरकाडे, अजय वाघ, राईस खान आदिसह पर्यावरणप्रेमी विद्यार्थी आणि नागरिकांची उपस्थिती होती. संघटनेच्या भावना लक्षात घेऊन त्यावर सकारात्मक कार्यवाही करण्याची आशा यावेळी व्यक्त केली गेली.